उज्ज्वल कुळकर्णी

           प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत आल्यावर पहिल्याच दिवशी ती मोठी शाळा, मोठे आवार इतके मुलं मुली पाहून नाही म्हटलं तरी थोडसं घाबरायला झालं होतं .पण आई शाळेत असल्यामुळे मी मात्र खूपच खुशीत होतो. लहान वर्गांना त्यावेळी शिवण हा एक विषय असायचा. बरं ते वय असं होतं की बरोबरीचे सर्वच सोबत असायचे. एका तासाला शिवणाच्या वर्गात आम्ही प्रवेश केला. तिथे असलेली शिवण यंत्रे पाहून खूप आनंद झाला. शिवण शिकवणाऱ्या सरांनी सर्वात प्रथम शिवण यंत्राची माहिती द्यायला सुरुवात केली. लपलपी म्हणजे काय, बॉबीन म्हणजे काय याची प्रथम माहिती दिली.  बॉबीन कशी भरतात हे त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवले. तुम्हाला सुताची  माहिती आहेच असे त्यांनी सांगताच मन क्षणभर पुन्हा प्राथमिक शाळेत गेले. टकळीचा परिचय तिथेच झाला. पेळू कशाला म्हणतात आणि तो कसा असतो हे प्रत्यक्ष दाखवून नंतर टकळी कशी फिरवायची टकळीवर सूत कसे काढायचे हेही छान शिकविले होते. दुकानातून पेळू विकत आणतांना आपण फार मोठे काम करतो आहे असे वाटायचे. डाव्या हातात पेळू धरून उजव्या हाताने टकळी फिरवीत सुत काततांना एक वेगळाच आनंद मिळायचा. प्राथमिक शाळेतच चरख्याचा परिचय झाला. चरख्यावर सुत कसे कातायचे याचे पूर्ण ज्ञान आल्यावर चरखा चालवताना होणारा आनंद खरोखरीच अवर्णनीय होता. पेटी चरखा घरी मिळाला की सगळ्यांना तो दाखविणे म्हणजे एक मोठा कार्यक्रमच असायचा. तिथेच माग म्हणजे काय हे समजले. मागावर बसल्यावर धोट्या कसा चालवायचा तिही कला समजली. मागावर कापड तयार होते हे ज्ञान त्यावेळी वयाच्या दृष्टीने खूपच मोठे होते.

      आज माध्यमिक शाळेत शिवणाच्या सरांनी सुईमध्ये धागा कसा ओवायचा हे शिकविले तेव्हा पटकन आईची आठवण आली. कारण नेमके शाळेत जाताना शर्टाची बटणे किंवा चड्डीची बटणे तुटलेली असल्याचे लक्षात येताच आईच्या मागे लागून ती लावून घेतली जात असत. त्यावेळी सुईच्या नाकामध्ये आई इतक्या पटकन दोरा ओवायची की मी पहातच रहायचो. आई मात्र -” असा कसा तुमचा वापर रे” असे पुटपुटायची. आज शिवणाच्या सरांनी सुईच्या नाकामध्ये दोरा ओवण्याचे शिकविल्याने केव्हा घरी जाऊन सगळ्यांना दाखवितो असे झाले होते.सरांनी लपलपीची माहिती लिहून द्यायला सुरुवात करताच मुले हसू लागली. लपलपी हे नावच हसू आणणारे त्यावेळी वाटायचे. मग सरही हसायचे. दोरा भरलेली बॉबीन मशीनमध्ये कशी बसवायची हे परत परत करून दाखवायचे. त्यामुळे सगळ्यांनाच ती क्रिया सोपी वाटून जमायची. शिवण यंत्राच्या मशीनच्या सुईच्या नाकात दोरा ओवून बॉबीन मधला दोरा बाहेर काढून मग कापड शिवण यंत्राच्या सुईच्या खाली व्यवस्थित ठेवून डाव्या हाताने शिवण यंत्राच्या चाकाला हलकासा धक्का देऊन दोन्ही पायांनी शिवण यंत्राचे पायडल मारून शिवण्याची क्रिया कशी सुरू होते हे पाहताना चेहऱ्यावर आश्चर्य असायचे. आमच्या वर्गातील बऱ्याच मुलांचे पाय त्या खाली असलेल्या पायडलपर्यंत पोहोचायचे नाही तरी मागे पुढे होऊन मशीन चालवल्याशिवाय कुणीच रहायचे नाही.एका चौरसाकृती  पांढऱ्या कापडाच्या चारही बाजू गोठ वाळून,  ते गोठ व्यवस्थित शिवण यंत्राच्या मशीनवर शिवून तयार झालेला पांढरा रुमाल ही त्यावेळी प्रत्येक मुलासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट होती. आजही डोळ्यांसमोर टकळी, चरखा आणि शिवण यंत्र आल्यावर जुन्या आठवणी भारावून टाकतात.