उज्ज्वल कुळकर्णी
अजूनही ते दिवस मनातून काही केल्या जात नाही. आमच्या नंदुरबारच्या तांबोळी गल्लीतल्या घरी बैठक खोलीमध्ये किंबहुना नंदुरबारातल्या जवळजवळ प्रत्येक घरी स्वच्छ पुसलेला काच लावलेला कंदील मध्यभागी ठेवलेला असायचा. त्या कंदीलाच्या प्रकाशाने सारी बैठक खोली उजळून निघायची. तेव्हा असे वाटायचे की केवढा हा प्रकाश ! त्या कंदीलाच्या प्रकाशात अभ्यास करतांना आपण फार मोठे कार्य करीत आहोत असे वाटायचे. तो प्रकाश डोळ्यांना सुखद वाटायचा. कंदीलाची वात मोठी असेल तर ती थोडी कमी करायची सूचना मिळायची. तरी लहानपणी एक खेळ सगळ्यांना करावासा वाटायचा तो म्हणजे कंदीलाची वात खाली वर करत राहणे. मग कोणीतरी पाहिल्यानंतर- ”हे काय चालले आहे” असे विचारल्यावर हाताची घडी करून वाचन सुरू असायचे. कंदिलात जास्त रॉकेल भरले गेले तरी त्याचा भडका म्हणजे एक प्रकारचा संतापच व्हायचा मग रॉकेल कमी करून तो व्यवस्थित केला जायचा. कंदीलाची वात वेडी वाकडी कापलेली असेल तर कंदीलाची ज्योत एकाच दिशेने तीव्रतेने प्रकाश द्यायची त्यामुळे कंदीलाची काच काळी व्हायला सुरुवात व्हायची मग कंदीलाची काच बाजूला घेऊन कंदील विझवला जायचा. गरम काच थंड होऊ देवून स्वच्छ पुसला जायचा आणि कंदीलाची वात नीट काळजीपूर्वक कापून नंतर कंदील पुन्हा पेटविला जायचा. तेव्हा तो नीट प्रकाश द्यायचा. तेव्हा ओगले यांचा कंदील काच जास्त प्रमाणात वापरला जायचा. चिमणीचे वेगवेगळ्या प्रकारचे काच असायचे. साधा काच, वरच्या बाजूला फुलांच्या पाकळ्यांचा आकार असलेला काच मिळायचे. घरात कंदील, चिमण्यांच्या वाती जास्तीच्या आणून ठेवलेल्या असायच्या. कोनाड्यात ठेवलेल्या चिमणीचा उजेड खोलीभर छान पसरायचा. चिमणी असो किंवा कंदील या दोघांच्या प्रकाशात वाचतांना डोळ्यांना कधीच त्रास वाटायचा नाही. परीक्षा जवळ आली की रात्री जेवण झाल्यावर पुन्हा अभ्यासाला सुरुवात करतांना चुकून ओला हात झटकला गेला आणि पाण्याचा थेंब कंदीलाच्या काचेवर पडला की काच तडकायची मग उगीचच ओशाळं व्हायचं पण आईच्या - “होतं असं चुकून. काच काढण्याचा प्रयत्न मात्र करु नकोस.” या वाक्याने धीर वाटायचा. कंदील, चिमणी यांचे काच तसेच कंदील, चिमणी यांचे फूल विकत आणणे ही मोठी मानाची गोष्ट असायची. आमच्या घरी पितळेचा एक सुंदर लॅम्प होता. त्याचा काचही मोठा होता.त्याचा प्रकाशही खूप पडायचा. ते आमच्यासह इतरांसाठीही आकर्षण असायचे. नगरपालिकेतर्फे प्रत्येक गल्लीत एक खुंटावरचा दिवा असायचा. रोज तो दिवा लावायला एक व्यक्ती यायची. त्या दिव्यात रॉकेल भरायची जबाबदारी पण त्या व्यक्तीचीच असायची. ती व्यक्ती त्या दिव्याची काच पुसून स्वच्छ करून आवश्यक तेव्हा काच बदलायची काळजीही घ्यायची. लग्नकार्य, समारंभ यासाठी बत्ती आणली जायची. अशावेळी मुलामुलींसाठी बत्ती हे आकर्षणाचे केंद्र असायचे. बत्ती लावण्याची प्रक्रिया पहाण्यासाठी फार आतुरता असायची. बत्तीच्या पंपाने हवा भरून बत्ती पेटवितांना पेटलेल्या मेंटलचा प्रकाश कमीजास्त करुन नंतर एका विशिष्ट वेळी मेंटलचा प्रकाश स्थिर केला गेला की सर्व बच्चे कंपनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवायची. तेव्हा बत्ती भाड्याने देणारी दुकाने बोटावर मोजता येतील एवढीच होती. मात्र गावातील भर वस्तीत असलेले एक दुकान अतिशय प्रसिद्ध होते. ते बत्तीवालेकाका बत्तीच्या तंत्रज्ञानाबाबत अतिशय कुशल तंत्रज्ञ मानले जायचे. त्यांनी तयार करून दिलेली बत्ती बारा तास खात्रीने उत्तम काम देईल ही ते ग्वाही द्यायचे. वेळ पडल्यास नवीन मेंटल कसे जोडायचे तेही नीट समजावून सांगायचे. बत्तीसाठी बत्तीवालेकाका ग्रेट मास्टर मानले जायचे. प्रचंड कष्टाचे काम ते अतिशय मनापासून प्रामाणिकपणे सदैव करायचे. एक मात्र होते की त्यांच्या बत्तीशी कुणी उगाच केलेला खेळ त्यांना मुळीच आवडत नसे. बत्तीवाल्या काकांना जुनी पिढी कधीच विसरू शकणार नाही. काळ बदलला गावात वीज आली. कंदील, चिमण्या, बत्ती यांचा वापर खूप कमी झाला. एवढे असले तरी कंदील, चिमणी, बत्तीचे ते दिवस स्मरणातून जाणे कधीच शक्य नाही.