उज्ज्वल कुळकर्णी काळ कितीही पुढे गेला तरी काही माणसं आपल्या मनात कायमस्वरूपी जिवंत राहतात. माझ्या बालपणी दाढी, हजामत (कटिंग) करण्यासाठी केशकर्तनालयात जाणे हा प्रकार नव्हता. यासर्व गोष्टी घरीच व्हायच्या आणि हे करणारी व्यक्ती घरीच यायची. आमच्याकडे दादूकाका त्यासाठी यायचे. दादूकाकांची उंची तशी खूपच कमी होती. त्यांचा रंग उजळ होता. पांढरे धोतर आणि पांढरा अर्ध्या बाह्यांचा शर्ट त्याबरोबर डोक्यावर पांढरी टोपी मात्र त्या टोपीचे दोन्ही कोने कोणत्या कारणाने कळले नाही पण जवळजवळ गोलाकार झालेले होते. दादूकाका येतांना बगलेमध्ये एक पोते घेऊनच यायचे आणि उजव्या हातात दाढी, हजामत करण्यासाठी लागणारी कात्री, वस्तरा, मशीन, नराणी,तुरटीचा एक लहान चौकोनी तुकडा, एक रुमाल असलेली दंडगोलाकृती पेटी तिला वरच्या बाजूला धरायला चौकोनी कड्या होत्या. मला त्या पेटीचे फार आकर्षण होते कारण मला ती जादूची पेटी वाटायची. तिला उघडल्यावर मध्यभागापासून तिचे दोन भाग आजूबाजूला रहायचे आणि खालच्या भागात या साऱ्या वस्तू असायच्या. आमच्या घरी आल्यावर दादूकाका बगलेतले पोते एका कोनाड्यात ठेवून द्यायचे आणि स्वतःशीच म्हणायचे ‘याचे काम इथे नाही’ आमच्या घरी दाढी हजामत करताना वापरावयाची एक स्वतंत्र सतरंजी होती. तिचाच वापर या कामासाठी व्हायचा.दादू काका सदैव आनंदी असणारी एक उत्साही मूर्ती होती. विशेष म्हणजे दाढी किंवा हजामत करतांना एखाद्या विषयावर त्यांचे बोलणे सतत चालू असायचे. बोलत असतांना हसू आले तर त्यांचे सारे शरीर गदा गदा हलायचे. तेव्हा ते हातातले हत्यार पटकन बाजूला ठेवायचे. मला आठवते मी शाळेत असताना ते हजामत (कटिंग )करतांना पहिले वाक्य म्हणायचे ‘बाबू घाबरायचे कारण नाही. काहीही त्रास होणार नाही. आणि खरेच त्यांच्या हातामध्ये वेगळेच कौशल्य होते. डाव्या हातात कंगवा आणि उजव्या हातात कात्री घेऊन ते जेव्हा हजामत (कटिंग) करायला सुरुवात करायचे तेव्हा कंगवासुद्धा लागणार नाही याची ते पूर्ण काळजी घ्यायचे. मला तरी त्यांचा कंगवा कधीच टोचला नाही. एक मात्र होते की जेव्हा ते मशीनचा वापर करायचे तेव्हा गोड आवाजात फक्त एवढंच म्हणायचे ‘बाबू थोडं थोडं लागल्यासारखे वाटेल पण घाबरायचं कारण नाही’. नराणीने हातापायांची नखे पटापट काढतांना कधीही लागायचे नाही.जिव्हाळी लागणे हा प्रकार तर कधी नाही म्हणजे नाहीच.मशीनचा वापरही ते खरंच त्यांचे वैयक्तिक कौशल्य वापरून करायचे. एवढे लिहिण्याचे कारण म्हणजे ते नसतांना एका दुसऱ्या व्यक्तीकडून हजामत (कटिंग) करून घेण्याचा प्रसंग आला तेव्हा मी अक्षरश: रडलो होतो. त्या व्यक्तीची मशीन चालवण्याची पद्धती अशी होती की डोक्यावरचे केस नव्हे तर कातडीच खरवडली जाते आहे असे जाणवायचे.दादूकाका जेव्हा वडिलांची दाढी करावयाचे तेव्हा मी आवर्जून तिथेच बसून पहात राहायचो. अतिशय हलक्या हाताने ते वस्तरा चालवायचे. माझ्या लहानपणी जवळजवळ सर्वच मुलांचा उन्हाळ्याला सुरुवात झाल्यावर संपूर्ण गोटा केला जायचा. त्यावेळी दादूकाकांचा वस्तरा किती हलक्या हाताने चालतो याचा अनुभव यायचा. या उलट माझ्या काही मित्रांना डोक्यावर झालेली थोडीशी जखम ही गोटा करतांना झालेली असायची. त्यावेळी आमच्या गल्लीतील सर्वच हजामती (कटिंग) दादूकाकाच करायचे. ओट्यावर पोते टाकून हा कार्यक्रम चालायचा. हा कार्यक्रम पहाणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे असे समजून आम्ही मित्र मंडळी खुशाल एखाद्या ओट्यावर गोलाकार उभे रहायचो. पण कोणीही कधीही रागवायचे नाही. दादूकाकांची बायको धान्य निवडण्याचे काम करायची. अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिकपणे काम करायची तिची वृत्ती होती. दादूकाकांचा मुलगा मुंबईच्या मामाकडे त्यांच्या दुकानावर कामाला होता. एकदा अचानक दादूकाका आजारी पडले ही बातमी कळताच त्यांना पाहण्यासाठी अनेकांनी त्यांना भेटून ‘काही लागल्यास जरूर सांगा’ असे हक्काने सांगितल्याचे मला पूर्ण आठवते. लोकांच्या या प्रेमाने दादूकाका त्यावेळी अक्षरशः रडले. काळ पुढे जात होता. मी प्रताप महाविद्यालय अमळनेरला पहिल्या वर्षाला असतांना नंदुरबारला घरी आलो होतो दादूकाका त्याचवेळी मुंबईला आपल्या मुलाकडे नंदुरबार सोडून जायला निघाले होते. मला रहावले नाही. मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो तेव्हा अनेक लोक त्यांना भेटायला आले होते. एरवी खूप बोलणारे दादूकाका हमसून हमसून रडत होते आणि त्यांचे सारे शरीर गदा गदा हलत होते. मी दादूकाकांना गदगदून हसतांना पाहिले होते. त्यांचे हे रुप पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आले. माझ्या डोळ्यातले पाणी गालांवरून केव्हा वहायला लागले हे मलाच समजले नाही. सामान्य परिस्थितीतही आपले काम करतांना आपण आनंदाने जगून इतरांनाही आनंद देऊ शकतो एवढे मात्र आपल्या वागण्याने दादूकाका सगळ्यांना शिकवून गेलै. आज दाढी कटिंगसाठी मोठे-मोठे एसी सलून आहेत. ट्रीमर,शेव्हर आले आहेत पण का कोणास ठाऊक दादूकाकांच्या कैची कंगव्याच्या कटिंगची सर आजही नाही एवढे मात्र जाणवते.