- उज्ज्वल कुळकर्णी मला लहानपणापासून आकाशातील ढग पहायची आवड. निळ्याशार आकाशाच्या पटलावर पळणारे पांढरे ढग. कधी कधी अगदी विरळ जणू पिंजलेला पांढरा कापूस पसरुन ठेवलेला. हे विरळ पांढरे ढग काही काही वेळा इतक्या वेगाने पळतात की हसूही येतं. वाटतं की यांना कसली इतकी घाई झाली आहे उमजतच नाही. कधी कधी एकच गडद मोठा पांढरा ढग इतका हळूहळू पुढे सरकत जातो की वाटतं हा खूप आळशी आहे की काय. पण अशा पांढऱ्या शुभ्र ढगाला शुद्ध चांदीच्या रंगाची लोभस रुपेरी कडा दिसते तेव्हा त्याचा रुबाब मस्तकावर रुपेरी मुकुट असलेल्या महाराजासारखा जाणवतो. हे सारे पांढरे ढग शेवटी कुठे गोळा होतात हा प्रश्नही मला पडायचा. लहाननपणी या पांढऱ्या ढगांमध्ये वेगवेगळ्या प्रतिमांचा होणारा आभास ही खूप आनंददायी गोष्ट असायची. आपल्याला जाणवलेली प्रतिमा मित्रांना समजावून सांगताना प्रौढपणाचा एक वेगळाच आविर्भाव चेहऱ्यावर असायचा. खूप वेगवेगळ्या दृश्यांचा आभास जाणवला की निसर्गाची किमया खऱ्या अर्थाने किती महान आहे हे जाणवते. पांढऱ्या ढगांची ही कलाकृती पाहतांना किती वेळ जातो हे कळतच नाही. पांढऱ्या ढगांच्या कलाकृती मनामनांप्रमाणे बदलत जातात हाही उलगडा होतो. वाढणारा उष्मा मग आवर्जून काळ्या ढगांची आठवण करायला लावतो.
अचानक आकाशाचे रूपांतर आभाळात होतांना, काळ्या ढगांनी सारे आकाश भरतांना, आभाळाचे रुप बदलत जातांना प्रचंड उष्मा नाहिसा होण्याची आशा पल्लवीत होतांना, डोळे एकटक पहात रहातात काळ्या ढगांना. पहिल्या पावसाची वादळी सुरुवात हृदयात धडकी भरवते. ओट्यावरुन आत येऊन घरातल्या खिडकीत बसून निरीक्षण केले जाते. आता या परिस्थितीचा मनापासून आनंद होतो. उन्हाळा अंगावर झेलणारी धरित्री सारा जीव एकवटून आभाळ कोसळण्याची वाट आतुरतेने पहात असते. काळ्या ढगांतून कोसळणाऱ्या पांढऱ्या जलधारांनी चिंब होतांना सहन केलेला ताप विसरत तृप्त होत जाणारी धरित्री. थंडगार वातावरणाने अंगावर येणारी सुखद शिरशिरी. मग काळ्या ढगांचा खरा चमत्कार सुरू होतो. दिवसागणिक धुवांधार कोसळणारा पाऊस खऱ्या अर्थानं धरित्रीला तृप्त करायला सुरुवात करतो. कधी कधी काळ्या ढगांचे रौद्ररूप, वारंवार चमकणाऱ्या वीजा, समोरचे दिसणार नाही असा कोसळणारा पाऊस पाहून आई म्हणायची -” हा पाऊस आहे की आरिष्ट “. काही वेळा काळ्या ढगांची दाटी अंधारुन टाकते. ढगांच्या गडगडाटाने सारा परिसर दणाणून जातो. क्षणाक्षणाला वीजांची चमक जाणवते. पाऊस झोकून दिल्यासारखा पडतच रहातो. निसर्ग आपला चमत्कार दाखवतो. शेतातल्या काळ्या जमिनीत पेरलेले अंकुरित होते. हळूहळू हिरवाई बहरुन येते. निसर्गाची किमया अचंबित करुन जाते. नजरेसमोर काळे पांढरे ढग येतात. चेहऱ्यावर समाधानाचे हसू असते आणि डोळ्यात आनंदाश्रू.