उज्ज्वल कुळकर्णी आयुष्य कसेही पदरी पडलं तरी ते जगावंच लागतं. कोसळणारा धुवाधार पाऊस चालू असतांना आपल्या पत्र्याच्या खोलीमध्ये कलाबाई आपल्या दोन मुले आणि दोन मुलींसह डोळे उघडे ठेवून झोप येण्याची वाट पहात होती. वरच्या पत्र्यांमधून ज्या ठिकाणी कमीत कमी गळत असेल अशा ठिकाणी गोधड्या टाकून सारी झोपली होती. अंगावरही गोधड्या घेऊन त्यावर पातळ प्लास्टिक पांघरण्यासाठी एवढ्यासाठी घेतले होते की जर पाऊस आलाच आणि गळायला लागले तर प्लास्टिक वरून पाणी घसरून जाईल गोधडी किंवा अंग ओले होणार नाही. हे सारे केवळ मनाच्या समाधानासाठी होते कारण पत्रे इतक्या ठिकाणी गळत असायचे की रात्रभर अर्धओले होऊनच झोपावे लागायचे. दिवसभराच्या कष्टांनी केव्हातरी डोळा लागला की जेवढी होईल तेवढ्या झोपेत समाधान मानून सारे कामाला तयार. दोन्ही मुली धुणेभांड्यांची कामे तर दोन्ही मुले किराणा दुकानावर काम करीत होती. शिक्षणाचा गंधही त्यांना नव्हता. नवऱ्याने दारूच्या व्यसनाने अकाली जगाचा निरोप घेतल्याने उघड्यावर पडलेले सारे कुटुंब कलाबाईला जबाबदारीने हातात घ्यावे लागले. अर्धवट ओल्या कपड्यांनीच दिवसभर काम करणे हाच एक पर्याय सर्वांसमोर पावसाळ्यात असायचा. कामासाठी आल्या आल्या कलाबाईंना आमच्याकडे गरमागरम एक कप चहा मिळायचा त्याने सुद्धा त्या दिलखुलास हसायच्या.

      पावसाळा संपला की हळूहळू थंडी वाढायला सुरुवात व्हायची पत्र्याची खोली असल्यामुळे ती थंडगार व्हायची. घरातल्या पत्र्यांना अनेक ठिकाणी हवा आत येण्याची सोय असल्याने खोलीतील वातावरण आणखीनच थंड व्हायचे. कसेतरी कान बंद करून, गोधड्या अंगावर घेऊन कुडकुडतच रात्र पार करावी लागायची. कोणी प्रेमाने दिलेले स्वेटर अशा वेळी कामी यायचे. आमच्या घरून मिळालेले पुढे बटन असलेले स्वेटर घालून कलाबाई आली की आल्या आल्या म्हणायची- “आज मी मॅडम झाली आहे”. थंडीतही थंडगार पाण्यात हात टाकतांना स्वतःचे उगाचच कोडकौतुक न करता मन लावून भांडे घासून कलाबाई निघून जायची. रात्रीच्या वाढत्या थंडीमध्ये पाय पोटाशी घेऊन झोपलेल्या आपल्या लेकरांकडे पाहत एवढ्या थंडीतही कलाबाईंच्या डोळ्यांमध्ये अश्रू यायचे.                     हळूहळू ऋतू बदलायची चिन्हं दिसू लागायची. वातावरण गरम व्हायला सुरुवात व्हायची. दिवसा दिवसागणिक जसे जसे ऊन वाढत जायचे तसे तसे कलाबाईच्या बोलण्यात घरच्या परिस्थितीचे वर्णन येऊ लागायचे. वाढत्या उन्हाने तापलेल्या पत्र्यांची झळ पूर्ण घरभर फिरायची. घामाने साऱ्यांचेच अंग ओले व्हायचे. थंडगार पाण्याने सकाळी सकाळी आंघोळ करून सगळे आपापल्या कामावर प्रामाणिकपणे निघून जायचे. यावर बोलताना कलाबाई नेहमी एकच म्हणायची  - “परमेश्वराने गरिबी दिली आहे. पण लेकरं मात्र सोन्यासारखी दिली आहे. कधीही कुठलीही तक्रार नाही की टोकाचा हट्ट नाही” .ऋतू बदलला तरी त्या ऋतूचा त्रास सहन करायची पूर्ण क्षमता ठेवून कलाबाईच्या कुटुंबाने समाधानाने आपला जीवन प्रवास चालू ठेवला आहे. परिस्थिती कशीही असो तिला समर्थपणे तोंड देत स्वीकारण्याचे सामर्थ्य ह्या मनांमध्ये परिस्थितीच निर्माण करते. साध्या साध्या गोष्टीतही आनंद घेत जगतांना कधी कुणाचा हेवा न करता परिस्थितीवर मात करीत जगण्याचा हा वसा नक्कीच स्वीकारण्यासारखा आहे.